Pune District : जिल्हा बँकेच्या मतदार प्रतिनिधी निवडीसाठी हालचालींना वेग
Pune District : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात अपवाद वगळता खेड तालुक्यातून आजी-माजी आमदारांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

राजगुरुनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, खेड तालुक्यात मतदार प्रतिनिधी निवडीच्या प्रक्रियेला राजकीय रंग चढू लागला आहे. सहकारी संस्थांमधून मतदार प्रतिनिधी निवडण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर असल्याने तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय ताकद आणि सहकार क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याने गावोगावी बैठका, गाठीभेटी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
गेल्या दोन पंचवार्षिक काळात जिल्हा बँकेचे संचालक राहिलेले माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गटासमोर आता विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय आघाडीचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या सहकारी संस्थेतून कोणाचा समर्थक मतदार प्रतिनिधी म्हणून निवडला जाणार, यावरच पुढील राजकीय गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात अपवाद वगळता खेड तालुक्यातून आजी-माजी आमदारांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सहकार महर्षी तथा माजी आमदार स्व. आप्पासाहेब ऊर्फ साहेबराव सातकर, स्व. नारायणराव पवार, जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती स्व. बाळासाहेब शेटे तसेच गेल्या दोन पंचवार्षिक काळात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालकपद भूषविले आहे. त्यामुळे या पदाला तालुक्याच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे.
दरम्यान, मोहिते पाटील यांच्या गटाकडून प्रत्येक सहकारी संस्थेत आपला प्रभाव असलेला मतदार प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात गावोगावच्या सहकारी संस्थांमध्ये होणार्या प्रतिनिधी निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात तालुक्यातील विविध राजकीय विरोधक एकवटले होते. या लढतीत आमदार बाबाजी काळे यांनी तब्बल 52 हजार मतांचे विक्रमी मताधिक्य मिळविले होते.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विरोधकांची एकजूट जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही कायम राहिली, तर मोहिते पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांमध्ये पूर्वीसारखे एकमत राहिले नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवून देणारे तसेच प्रत्यक्ष निवडून आलेले काही माजी सदस्यही जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे गटनेते ड. विजयसिंह शिंदे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे आमदार बाबाजी काळे स्वतः माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरणार का, की अन्य एखाद्या नव्या चेहर्याला संधी दिली जाणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मतदार प्रतिनिधी निवडीच्या निमित्ताने सध्या खेड तालुक्यातील गावोगावच्या राजकारणाला वेग आला असून, आगामी दिवसांत बैठका, गाठीभेटी आणि राजकीय मोर्चेबांधणी आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील ही पहिली मोठी सहकारातील राजकीय लढत ठरणार असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरणार, याची उत्सुकता आतापासूनच निर्माण झाली आहे.
104 सहकारी संस्थांवर लक्ष
खेड तालुक्यात एकूण 104 सहकारी संस्था असून, या संस्थांमधून निवडले जाणारे मतदार प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक संस्थेतील प्रतिनिधी निवड ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. मागील निवडणुकांमध्येही मोजक्या मतदार प्रतिनिधींच्या माध्यमातून संचालकपदाची लढत रंगली होती.
दहा वर्षांची अट रद्द
जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी दहा वर्षांची अट लागू झाल्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी संभाव्य पर्यायी उमेदवाराच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ही अट रद्द झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. त्यामुळे आता स्वतः मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की समर्थकाला संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे.
मतदार प्रतिनिधी निवडीतच खरी रंगत
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वीची पहिली आणि सर्वाधिक महत्त्वाची लढाई मतदार प्रतिनिधी निवडीची आहे. प्रत्येक गावातील सहकारी संस्थेचा प्रतिनिधी कोणत्या गटाच्या बाजूने जातो, यावर पुढील राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपर्यंत होणार्या या निवडीकडे दोन्ही गटांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे.
तालुक्यातील जिल्हा बँकेचे मतदार
गट अ : 104 मतदार
गट ब : 3 मतदार
गट क : 55 मतदार
गट ड : 134 मतदार





