नगर – प्लॉट खरेदी – विक्रीच्या वादातून माजी सैनिक विठ्ठल नारायण भोर (वय 48, रा. गणेश चौक, बोल्हेगाव) यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी (वय 33) व स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, दोघे रा. सावेडी) यांना राहाता न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
लोणी ते तळेगाव रस्त्यावर गोगलगाव (ता. राहाता) शिवारात रविवारी दुपारी भोर यांचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत लोणी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात स्थानिक गुन्हे शाखेने मोतीयानी व गोसावी यांना संशयावरून अटक केली आहे. त्यांना मंगळवारी राहाता येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत करण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करायचे आहे, आरोपी मयत भोर यांना कुठून घेऊन गेले, घटना कुठे घडली, खून केल्यानंतर मृतदेह लोणी येथे का टाकण्यात आला, जागेच्या व्यवहारात आणखी काही व्यक्तींचा संबंध आहे, त्यांचाही तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ऍड. महेश तवले व ऍड. संजय दुशिंग यांनी काम पाहिले.