Monsoon Alert | ऑरेंज अलर्ट जारी! राज्यात परतीच्या मान्सूनचा प्रभाव वाढणार ; हवामान खात्याचा इशारा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील ४८ तासांत मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार, तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून थांबलेल्या परतीचा मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या २४ तासांत परतीच्या मान्सूनने पंजाब व हरियानाचा उर्वरीत भाग, राजस्थान व गुजरातचा
आणखीन काही भाग तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिराचा काही भागातून माघारी परतला आहे, तसेच राज्यात कालचे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिसा आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कायम आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
राज्यात पुढील २४ तासांत रायगड, पुणे, सोलापूर, परभणी, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार, तर काही भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.


