Monsoon Alert | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ; घाट आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी अलर्ट

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील घाट परिसराला भारतीय हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, गेल्या ४८ तासात राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोव्यात बहुतांश जिल्ह्यात, विदर्भातील बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. शनिवारी (दि. ३०) कोकण आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
रविवार, ३१ ऑगस्ट रोजी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल.
विदर्भातील अकोला, अमरावती, गडचिरोली आणि नागपूर येथे मेघगर्जना आणि सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर भंडारा, बुलढाणा, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.



