Monsoon Alert | मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू ; महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे संकेत

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नैऋत्य मौसमी पावसाचा (मान्सून) परतीचा प्रवास रविवारी (दि. १४ सप्टेंबर) पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील चारही विभागांत पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१७ सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यंदा तीन दिवस अधीच मान्सून राजस्थानमधून परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परतीचा मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात राजस्थानच्या आणखी काही भागांसह गुजरात आणि पंजाबच्या काही भागातून बाहेर पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे, तर महाराष्ट्रातून साधारण १० ऑक्टोबरला परतीचा पाऊस येईल.
दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र आज उत्तर तेलंगणा आणि लगतच्या विदर्भावर आहे, तर एक कमी द्रोणीय क्षेत्र या कमी दाबाच्या क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. त्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत, तर मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
घाट विभागाला ऑरेंज अलर्ट..
राज्यातील रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस, तर दि. १५ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पाऊस पडेल, तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागांतही अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.



