Pune News | राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून, पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.दि. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यातील रायगड आणि रत्नागिरी अतिमुसळधार, तर विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या २४ तासांत विदर्भ आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कमाल व किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम असून, कोकण-गोव्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.





