Mansoon Alert | परतीचा मान्सून सक्रिय! महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट ; कोकण, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यातील कोकण-गोव्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दिवसभरात मेघगर्जना आणि ३० ते ४० ताशी वेगाने वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. तर पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, कोकणासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
परतीच्या मान्सूनची सीमारेषा कायम आहे. वातावरणाच्या मधल्या थरातील मराठावाड्यावरील वाऱ्याची चक्रीय स्थिती कायम आहे. एक द्रोणिका रेषा दक्षिण उत्तर प्रदेशच्या मध्यभागापासून मराठवाड्यापर्यंत जात आहे. तर उत्तर दक्षिण द्रोणिका रेषा दक्षिण महाराष्ट्र ते पश्चिम मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस दि. १९ आणि २० सप्टेंबर रोजी कोकण-गोव्यासह विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेस पाऊस पडेल.
दि. १९ सप्टेंबरला नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, धाराशीव, बीड, सोलापूर, लातूर, परभणी, अमरवती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात मेघगर्जना आणि ३० ते ४० ताशी वेगाने वारे वाहत हलका ते मध्यम पाऊस पडेल. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.


