Mohammed Siraj : सलामीच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात मोठा बदल! हर्षित राणाच्या जागी ‘या’ अनुभवी गोलंदाजाला मिळाली संधी
Mohammed Siraj : हर्षितच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मुख्य संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

Mohammed Siraj replaces Harshit Rana in T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्या सामन्याला काही तास शिल्लक असताना भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. सराव सामन्यात गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा वर्ल्ड कपमधून बाहेर फेकला गेला आहे. वृत्तसंस्था ‘ANI’ च्या अहवालानुसार, हर्षितच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मुख्य संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
हर्षित राणाच्या दुखापतीवर सूर्याची प्रतिक्रिया –
७ फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) होणाऱ्या सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत हर्षितच्या प्रकृतीवर माहिती दिली. सूर्या म्हणाला, “हर्षितची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. जरी आम्ही अधिकृत निर्णयासाठी ६ फेब्रुवारीच्या संध्याकाळपर्यंत वाट पाहत असलो, तरी त्याची स्थिती पाहता तो खेळण्याची शक्यता धूसर आहे.”
Mohammed Siraj to join Team India for the T20 World Cup as a replacement for Harshit Rana: Sources
— ANI (@ANI) February 6, 2026
रिप्लेसमेंटबाबत बोलताना सूर्याने स्पष्ट केले की, “आम्ही अशा गोलंदाजाचा शोध घेत आहोत, ज्याने गेल्या १-२ वर्षांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. जरी तो फलंदाजी करू शकणारा गोलंदाज असला तर उत्तमच, पण ९ व्या क्रमांकाच्या खेळाडूकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा करण्यापेक्षा आमच्या वरच्या फळीतील ८ फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडणे अधिक महत्त्वाचे आहे.”
मोहम्मद सिराजचे पुनरागमन –
मोहम्मद सिराज हर्षित राणाच्या जागी टी-20 विश्वचषक 2026 संघात दाखल
मोहम्मद सिराजने जुलै २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने या फॉरमॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. मात्र, सिराजचा अनुभव आणि कसोटी-वनडेमधील त्याचा घातक फॉर्म पाहता निवड समितीने त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे.
टी-२० आकडेवारी: सिराजने आतापर्यंत १६ टी-२० सामन्यांत १४ बळी घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट ८ पेक्षा कमी आहे.
अनुभव: २०२४ च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता, त्यामुळे वानखेडेसारख्या महत्त्वाच्या खेळपट्टीवर त्याचा अनुभव भारतासाठी मोलाचा ठरेल.
उद्या अमेरिकेविरुद्ध ‘महामुकाबला’ –
हर्षित राणाच्या दुखापतीमुळे भारताच्या वेगवान माऱ्यात बदल झाला असला, तरी सिराजच्या येण्याने अनुभवी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना चांगली साथ मिळेल. उद्या ७ फेब्रुवारीला घरच्या मैदानावर (वानखेडे) भारत आपल्या विश्वचषक मोहिमेची दिमाखात सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे.





