Mobile Theft Gang: गर्दीचा फायदा उठवून ६३ मोबाइल लांबवले! पोलिसांचा सापळा अन् ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
Mobile Theft Gang: पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत भाविकांचे मोबाईल चोरणाऱ्या मालेगावच्या ११ जणांच्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक.

Mobile Theft Gang – विसर्जन मिरवणुकीत भाविकांकडील मोबाइल चोरणाऱ्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून ६३ मोबाइल, मोटार असा ३० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेले ११ आरोपी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील आहेत. अब्दुल कादीर नूर मोहम्मद ( २८), अब्दुल मलीक अब्दुल खालीक ( २२), जियाउल रहेमान शौकत हुसेन ( २६), मोहम्मद अस्वद मोहम्मद अजमल ( ३१),
फैसल अजीज खान ( २४), हुजेफा अंजूम मोहम्मद साजीद ( ३०), जुबेर अहमद मुख्तार अहमद ( ३५), अजहर अहमद अल्ताफ अममद मोमीन ( ३०), नावेद अख्तर शफीक अहमद अन्सारी ( ३३), अतहर अहमद एजाज अहमद ( २३, सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक), अतुल मारोती इंगळे ( २४, रा. गिरोली, जि. वाशीम) यांना अटक केली आहे. विसर्जन मिरवणुकीत भाविकांची लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना परिसरात गर्दी झाली होती.
मिरवणुकीत भाविकांचे मोबाइल चोरणारी चोरट्यांची टोळी नदीपात्र परिसरात फिरत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चोरट्यांना ताब्यात घेतले. चौकशीत मिरवणुकीतील भाविकांकडील मोबाइल चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६३ मोबाइल, कार जप्त केली.
चोरटे विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरी करण्यासाठी खास मोटारीने मालेगावातून पुण्यात आले होते. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, मनीषा वलसे, सहायक फौजदार प्रदीप खळदकर, गणेश चोबे, तेजस चोपडे, गणेश जाधवर, बिडे, वालकोळी, सावके, वाघ, बेडवाल, भोसले, येसनपुरे यांनी ही कामगिरी केली.





