Sangli : शौच खड्ड्याच्या टाकीत गुदमरून तिघांचा मृत्यू; कवठेमहांकाळजवळील शिरढोण येथील दुर्घटना
Sangli : सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे शौचखड्ड्याची सफाई करताना तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. एकाला वाचवण्यासाठी उतरलेले दोघेही दगावले.

Sangli : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाजवळ एका हॉटेलच्या पाठीमागील शौचखड्ड्याची स्वच्छता करण्यासाठी टाकीत उतरलेल्या तिघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मृतांमध्ये तुषार बाळासाहेब कोष्टी (वय २५), आकाश उर्फ अक्षय अनिल बागडे (वय २३) आणि यशवंत बिरू शेळके (वय ७६) यांचा समावेश आहे. हे तिघेही कवठेमहांकाळ शहरातील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शौचखड्ड्याची स्वच्छता करण्यासाठी पाच जण गेले होते. यावेळी सर्वप्रथम यशवंत शेळके टाकीत उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही त्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने आकाश बागडे त्यांना मदत करण्यासाठी टाकीत उतरला. त्याचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर तुषार कोष्टी हा देखील टाकीत उतरला. मात्र, दुर्दैवाने तिघेही बाहेर आले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस आणि महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायतीची अग्निशमन गाडीही मदतीसाठी बोलावण्यात आली. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी तपासणी केली असता तिघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी व पंचनामा केला.
तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.





