Bhama Askhed Dam: भामा आसखेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर! जिल्हा परिषदेचे ‘पीएमआरडीए’ला पत्र…वाचा सविस्तर
Bhama Askhed Dam: भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बेकायदेशीर कारखान्यांची कामे; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण शहरांच्या पाणीपुरवठ्यावर प्रदूषणाचे सावट.

Bhama Askhed Dam- खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कारखान्यांची कामे सुरू असल्याने धरणाच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पत्र पाठवून संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायतराज विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी हे पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषद सदस्या सुनीता शरद बुट्टे पाटील यांनी 7 जुलै रोजी दिलेल्या पत्राच्या संदर्भाने ही कार्यवाही करण्यात आली आहे. भामा आसखेड धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासाठी वापर होतो. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,
चाकण नगरपरिषद, 19 गावांसाठीची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच इतर गावांच्या पाणीपुरवठा योजना या जलाशयावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणार्या कोणत्याही संभाव्य प्रदूषणाचा थेट परिणाम मोठ्या लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्यावर होऊ शकतो, अशी बाब जिल्हा परिषदेने पत्रात नमूद केली आहे.
करंजविहीरे, शिवे-वाकी तर्फे वाडा परिसरातील प्रश्न गंभीर
करंजविहीरे तसेच शिवे-वाकी तर्फे वाडा गावांच्या हद्दीत अशा ठिकाणी कारखान्यांची कामे सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे, जिथून वाहणारे ओढे आणि पाण्याचे नैसर्गिक उतार थेट भामा आसखेड धरणाच्या जलाशयात येतात. त्यामुळे या भागातील औद्योगिक कामांचा धरणाच्या पाण्यावर होणारा संभाव्य परिणाम तपासण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
दूषित पाण्याचा धोका
कारखान्यांमध्ये पेट्रोलियम पदार्थांचा वापर होत असल्याने दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जाण्याची किंवा बोअरवेलमध्ये सोडले जाण्याची शक्यता पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा परिणाम तात्काळ जाणवला नाही तरी भविष्यात धरणाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा जिल्हा परिषदेने दिला आहे.
‘प्रत्यक्ष पाहणी न करता परवानगी कशी?’
पाणलोट क्षेत्रातील या कामांबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा मुद्दाही पत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी न करता पीएमआरडीएकडून कारखान्यांना परवानगी कशी दिली जाते, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. भामा आसखेड धरणावर अवलंबून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पीएमआरडीएकडे केली आहे.
“भामा आसखेडच्या संवेदनशील पाणलोट क्षेत्रात कारखान्यांना परवानगी देताना पर्यावरणीय आणि जलसुरक्षेचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्रातील ओढे व उतार थेट धरणात येत असल्याने कारखान्यांमधून होणार्या संभाव्य प्रदूषणाचा भविष्यात पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पीएमआरडीएने संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून परवानग्यांची फेरतपासणी करावी आणि धरणाच्या पाण्याची सुरक्षितता धोक्यात येणार नाही, यासाठी तातडीने ठोस कार्यवाही करावी.”
– सुनीता शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्या






