MNS Leader : मनसेचा पदाधिकारी निघाला गांजाचा तस्कर; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

MNS Leader : भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात एका मोकळ्या मैदानात गांजाची तस्करी करण्याऱ्या मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्षला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. कुमार व्यंकटेश पुजारी (वय 34) असे पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 28 हजार रुपये असून पोलिसांनी आरोपीकडून गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त केली आहे.
पुजारी हा स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची साठवणूक आणि विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली असून, त्याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमार पुजारीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे? इतर टोळ्यांशी याचा काही संबंध आहे का? याचा सखोल तपास भिवंडी गुन्हे शाखा करत आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोन, गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. त्याच्या अटकेनंतर, या घटनेवर राजकीय कार्यकर्ते आणि इतर राजकीय पक्षांच्या सदस्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या युनिटनुसार, त्यांना एका व्यक्तीकडे परिसरात गांजा असल्याची माहिती मिळाली होती.
माहितीवरून कारवाई करत, भिवंडीतील कोंबाडपाडा येथील एका मोकळ्या जागेवर छापा टाकण्यात आला. पुजारीची तपासणी केल्यानंतर त्यांना त्याच्या ताब्यातून गांजा आढळला. प्राथमिक तपासात तो त्या परिसरात गांजा विकत असल्याचे उघड झाले.





