Mitchell Starc Rankings : मिचेल स्टार्कची ICC कसोटी क्रमवारीत मोठा उलटफेर! यान्सनला मागे टाकत पुन्हा काबीज केले नंबर १ चे सिंहासन
Mitchell Starc Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कने मार्को यान्सनला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे.

Mitchell Starc Reclaims Number One Spot In ICC Test Bowling Rankings : आयसीसीने ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात अव्वल स्थानी पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यान्सनला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा जगातील नंबर-१ गोलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला असला, तरी स्टार्कने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर त्याने हे सर्वोच्च स्थान पुन्हा पटकावले आहे.
केपटाऊन कसोटीत ९ विकेट्स; ८८१ रेटिंग गुणांसह स्टार्क अव्वल
दुसऱ्या कसोटीत स्टार्कला केवळ ३ विकेट्स मिळवता आल्या होत्या, तर यान्सनने ६ विकेट्स घेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, केपटाऊन कसोटीत स्टार्कने जोरदार पलटवार करत तब्बल ९ गडी बाद केले. या शानदार कामगिरीमुळे स्टार्कच्या खात्यात आता ८८१ रेटिंग गुण जमा झाले असून, तो पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सन ८७५ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
टॉप-१० मध्ये जसप्रीत बुमराह एकमेव भारतीय –
The latest update to the ICC Men’s Player Rankings reflect a week of big performances across formats 🤩
Read more 👉 https://t.co/hd3yd4FVUk https://t.co/2OI1jH2k7C
— ICC (@ICC) November 4, 2026
ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टॉप-१० मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असूनही बुमराह ८५३ रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानी टिकून आहे. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय गोलंदाज ठरला आहे. १९ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहला आपली क्रमवारी सुधारण्याची नामी संधी मिळणार आहे.
सिराज १६ व्या स्थानावर; एका स्थानाचे नुकसान
बुमराहनंतर कसोटी क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज १६ व्या क्रमांकावर घसरला आहे. ताज्या अपडेटमध्ये सिराजला एका स्थानाचा फटका बसला असून, त्याच्या खात्यात ६९६ रेटिंग गुण आहेत. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर कसोटी क्रमवारीतील मोठे फेरबदल अवलंबून असणार आहेत.





