Bumrah Loses Ranking : जसप्रीत बुमराहच्या हातून निसटलं सिंहासन, ‘या’ ३६ वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
Bumrah Loses Ranking : गेल्या अनेक दिवसांपासून अव्वल स्थानी ठाण मांडून बसलेल्या बुमराहचे सिंहासन अखेर डळमळीत झाले आहे.

Mitchell Starc Replaces Jasprit Bumrah As World Number 1 Test Bowler In Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अव्वल स्थानी ठाण मांडून बसलेल्या बुमराहचे सिंहासन अखेर डळमळीत झाले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला मुकल्यामुळे बुमराह दुसऱ्या स्थानावर घसरला असून, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत इतिहास रचला आहे.
८७२ रेटिंगसह स्टार्क अव्वल स्थानी; बुमराहची दुसऱ्या क्रमांकावर घसरण!
आयसीसीच्या ताज्या मानांकनानुसार, मिचेल स्टार्क दोन स्थानांची मोठी झेप घेत ८७२ रेटिंग गुणांसह जगातील नंबर-१ कसोटी गोलंदाज बनला आहे. दुसरीकडे, सामना न खेळल्यामुळे गुण गमावणाऱ्या जसप्रीत बुमराहला एका स्थानाचा फटका बसला असून, तो ८६२ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. श्रीलंका मालिका सुरू होण्यापूर्वी बुमराह ८७० रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान होता, मात्र दोन्ही सामन्यांतून बाहेर राहिल्यामुळे त्याच्या गुणांमध्ये मोठी घट झाली.
३६ व्या वर्षी स्टार्कची कमाल; बांगलादेशविरुद्ध १० विकेट्स टिपून रचला इतिहास!
A change at the top of the rankings for Test bowlers as an Australian quick claims the No.1 spot for the very first time 😲https://t.co/fvecGLHkbT
— ICC (@ICC) August 26, 2026
वयाच्या ३६ व्या वर्षी पोहोचलेल्या मिचेल स्टार्कने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याने वादळी मारा करत संघाला विजय मिळवून दिला होता. मॅके कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या १२ धावांत ६ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ३९ धावांत ४ विकेट्स घेत त्याने सामन्यात एकूण १० विकेट्स टिपले होते. या अफाट कामगिरीच्या जोरावर स्टार्कने थेट जागतिक क्रमवारीत अग्रस्थान काबीज केले.
बुमराहला नंबर-१ वर परतण्यासाठी करावी लागणार नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा!
श्रीलंका दौऱ्यासाठी सुरुवातीला बुमराहचा संघात समावेश करण्यात आला होता; मात्र पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला अखेर या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. भारतीय संघ आता थेट नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने तरी बुमराहला पुन्हा नंबर-१ वर पोहोचण्याची संधी मिळणार नाही आणि त्याला अव्वल स्थानाचा मुकुट परत मिळवण्यासाठी नोव्हेंबरमधील कसोटी मालिकेची वाट पाहावी लागेल.





