Manjrekar Slams Indiscipline : “लाड पुरवून खेळाडूंचे करिअर संपवू नका!” जैस्वालच्या राड्यानंतर भडकले मांजरेकर; ICC अन् BCCI ला सुनावलं
Manjrekar Slams Indiscipline : युवा खेळाडूंच्या अनुशासनहीनतेवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव केला जात असल्याचा आरोप बीसीसीआय आणि आयसीसीवर मांजरेकरांनी केला आहे.

Sanjay Manjrekar Slams ICC and BCCI Over Soft Stance On Jaiswal Sooryavanshi Indiscipline : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा खेळाडूंच्या गैरवर्तनावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मवाळ भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारख्या युवा खेळाडूंच्या अनुशासनहीनतेवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव केला जात असल्याचा आरोप मांजरेकरांनी केला असून, अशा नरमाईच्या धोरणामुळे खेळाडू बिघडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘तुम्ही त्यांना चुकीच्या वागणुकीचे प्रशिक्षण देत आहात!’; मांजरेकरांची संतप्त प्रतिक्रिया –
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) पोस्ट शेअर करत संजय मांजरेकर यांनी लिहिले, “आयसीसी आणि बीसीसीआयने लक्ष द्यावे! आधी वैभवने भारत-ए कडून खेळताना गैरवर्तन केले आणि आता यशस्वी जैस्वालने तीच चूक केली. जर तुम्ही खेळाडूंच्या अशा हिंसक आणि गैरवर्तनाचा सातत्याने बचाव करत राहिलात, तर तुम्ही अप्रत्यक्षपणे त्यांना अशीच वर्तणूक पुन्हा करण्याचे प्रशिक्षण देत आहात. हे खेळाच्या परंपरेसाठी अजिबात योग्य नसून, या युवा खेळाडूंच्या भविष्यासाठीही अत्यंत घातक आहे.”
Dear @icc & @bcci…
Vaibhav for Ind A recently & now Jaiswal… if you keep letting them get away with such behaviour, you train them to repeat such behaviour. It’s not good for the sport & crucially their own future too. 🙏— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) August 26, 2026
जैस्वाल-फर्नांडो वाद; आयसीसीने ठोठावला केवळ २५ टक्के दंड –
कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडोने यशस्वी जैस्वालला बाद केल्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि डोक्याने टक्कर दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आयसीसीने आचारसंहितेच्या कलम २.१२ (Article 2.12) चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर केवळ २५ टक्के मॅच फीचा दंड आणि १ डिमेरिट पॉइंट देऊन प्रकरण मिटवले. शारीरिक झटापट होऊनही खेळाडूंवर कोणतीही बंदी न लादल्याने मांजरेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वैभव सूर्यवंशीही श्रीलंकन खेळाडूशी भिडला होता –
याआधी जून महिन्यात भारत-ए आणि श्रीलंका-ए यांच्यातील सुपर ओव्हर सामन्यातील पराभवानंतर १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याचे श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलाम्बागे याच्याशी मैदानावर जोरदार भांडण झाले होते. खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करू लागल्याने अधिकारी आणि इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली होती. आयपीएल आणि अंडर-१९ मध्ये गाजलेल्या सूर्यवंशीने भारताच्या टी-२० संघात पदार्पण केले असले तरी, मैदानातील अशा गैरवर्तनामुळे युवा खेळाडूंच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.





