MH 12 New Series: पुणेकरांची ‘MH 12’ ओळख कायम! सप्टेंबरपासून वाहनांना मिळणार देशातील सर्वात अनोखा नंबर
MH 12 New Series: पुण्याची जुनी ओळख कायम ठेवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय; देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा नंबर मिळणार.

MH 12 New Series – पुणेकरांची अस्मिता आणि वाहनांची मुख्य ओळख बनलेली एमएच १२ (MH 12) ही वाहन नोंदणी सिरीज सध्या ऐतिहासिक बदलाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या सुरू असलेली दोन अक्षरांची अंतिम मालिका म्हणजेच (एमएच १२ झेडझेड) येत्या दोन ते तीन आठवड्यात संपेल. त्यामुळे ही सिरीज संपल्यानंतर पुढे काय, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले असून,
पुण्याची एमएच १२ ही ओळख कायम ठेवून आता एमएच १२ १ए (MH 12 1A) अशा स्वरूपात नवीन मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे आरटीओकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुणे आरटीओमध्ये दोन अक्षरांची वाहन नोंदणी जवळपास १९९२ मध्ये सुरू झाली. AA ते ZZ ही संपूर्ण मालिका संपण्यासाठी साधारण ३४ वर्षांचा (१९९२ ते २०२६) कालावधी लागला.
पुणे आरटीओमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र सिरिज चालवल्या जातात. त्यामध्ये दुचाकींसाठी झेड वाय (ZY) ही सिरीज ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात संपली आणि झेडझेड (ZZ) ही शेवटची सिरीज संपत आहे. चारचाकी वाहनांची झेडडब्ल्यू (ZW) ही सिरीज सुरू असून ती पुढील दोन महिन्यांत संपण्याचा अंदाज आहे.
देशात पहिलेच अनोखे क्रमांक…
पुणे आरटओसाठी तीन अक्षरांची (उदा. AAA) सिरीज नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेऱ्यांना टिपण्यात आणि ई-चलन प्रणालीत अडचणी निर्माण करणारी होती. याशिवाय पुणेसाठी एमएच ६१ (MH 61) हा नवीन कोड देण्याची चर्चा होती. मात्र, पुणे शहराची MH 12 ही जुनी ओळख पुसली गेली असती.
यामुळे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत MH 12 कोड कायम ठेवण्यास तत्त्वतः मान्यता मिळवली तसेच MH 12 1A (अल्फा-न्यूमेरिक) ही देशातील पहिली अनोखी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. त्यामुळे शहरातील नव्या वाहनांना आता MH 12 1A 0001 अशा स्वरूपाचे क्रमांक मिळणार आहेत.
…तर काही दिवस खोळंबा
केंद्र सरकारकडून वाहन पोर्टलच्या डीजिटल डेटाबेसमध्ये वेळेत बदल करून मंजुरी मिळाली नाही तर पुण्यातील नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तात्पुरते ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे वाहन खरेदीदारांचा खोळंबा होऊन आरटीओचा कोट्यवधींचा महसूल काही दिवस थांबू शकतो. त्यामुळे केंद्राचे तातडीने अंतिम शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे.





