Medical store strike : औषधांचा तुटवडा निर्माण होणार? औषध विक्रेत्यांचा बेमुदत संपाचा इशारा; नागरिकांनो ‘हे’ काम आधी करा
Medical store strike : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र; रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांचा साठा करण्याचे आवाहन.

Medical store strike – अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या औषध दुकान बंद आंदोलनाची तीव्रता वाढत असून, बेमुदत संपाची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण व नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असून आवश्यक औषधांचा आगाऊ साठा करून ठेवावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. जिल्हा केमिस्ट असोसिएशनने आपले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी सादर केले .
नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. संपामुळे जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता असून याचा परिणाम नियमित उपचार घेणारे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन सेवांवर होऊ शकतो, अशी चर्चा आरोग्य क्षेत्रात सुरू आहे.
मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने काही पर्यायी व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर, काही संघटनेबाह्य औषध दुकाने, रुग्णालय संलग्न मेडिकल तसेच जेनेरिक औषध दुकाने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयांतील आपत्कालीन सेवा देखील पूर्ववत सुरू राहतील. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत दिलेले परवाने हे सार्वजनिक आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच लागू कायदे आणि आदेशांची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सर्व केमिस्ट बांधवांनी संपात सहभागी न होता नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी लक्षात घ्यावी, असे आवाहन रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.
औषधांची अनुपलब्धता अथवा आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. दुसरीकडे शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर इथून पुढचा संप हा बेमुदत स्वरूपाचा राहिला, असा इशारा केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.





