Medha Kulkarni : पुणे-दिल्ली प्रीमियम रेल्वे सेवा उपलब्ध करा! डॉ. मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी
Medha Kulkarni : सध्याच्या गाड्यांमधील वेळेची अनिश्चितता आणि प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल; राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची जुनी मागणी पुन्हा ऐरणीवर.

Medha Kulkarni – देशातील महत्त्वाचे शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी केंद्र असलेल्या पुणे शहराला अद्यापही देशाची राजधानी नवी दिल्लीशी थेट, वेगवान आणि प्रीमियम श्रेणीची रेल्वे सेवा उपलब्ध नाही. केंद्र सरकारने पुणे-दिल्ली दरम्यान राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत स्लीपर किंवा तेजस एक्स्प्रेस यांसारखी प्रीमियम रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी,
अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली. शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.पुणे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील प्रमुख शिक्षण, संशोधन, आयटी, स्टार्ट-अप आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले आहे. देशभरातून अनेक जण पुणे- दिल्लीदरम्यान नियमित प्रवास करतात.
मात्र, सध्या या मार्गावरील रेल्वे प्रवासासाठी २० ते ३० तासांचा कालावधी लागतो. अनेक गाड्यांमध्ये वेळेची अनिश्चितता, प्रचंड गर्दी आणि मर्यादित सुविधा असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.देशातील अन्य प्रमुख शहरांना राजधानी, वंदे भारत आणि तेजससारख्या आधुनिक रेल्वे सेवांनी जोडण्यात आले आहे.
राजधानी एक्स्प्रेसमुळे राजधानी ते मोठी शहरे जलद, सुरक्षित आणि वेळेत जोडली गेली आहेत. वंदे भारत ट्रेनने रेल्वे प्रवासाची संकल्पनाच बदलली असून, आता लांब पल्ल्यासाठी वंदे भारत स्लीपर गाड्यांचाही विचार सुरू आहे. अशा वेळी पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराला या प्रीमियम सेवांपासून वंचित ठेवणे योग्य नाही.
या पार्श्वभूमीवर पुणे-दिल्लीदरम्यान राजधानी एक्स्प्रेस, वंदे भारत स्लीपर किंवा तेजस एक्स्प्रेसपैकी कोणतीही थेट प्रीमियम रेल्वे सेवा तातडीने सुरू करावी. जेणेकरून व्यापार, गुंतवणूक, शिक्षण आणि प्रशासकीय समन्वयाला चालना मिळून ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ मिळेल, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.





