नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदा येथून देशातील पहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील हावडा ते आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या जंक्शन दरम्यान धावणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३,२५० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन केले, तसेच उत्तर बंगालला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या चार अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही हिरवा कंदील दाखवला. आतापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांमध्ये केवळ बसण्याची सोय होती, मात्र लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता स्लीपर कोचची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना स्वस्त दरात विमानासारखा प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या नवीन ट्रेनमुळे हावडा ते गुवाहाटी दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे अडीच तासांनी कमी होणार असून, यामुळे पर्यटन आणि धार्मिक प्रवासाला मोठी चालना मिळणार आहे. तांत्रिक वैशिष्ट्यांचा विचार करता, ही ट्रेन १८० किमी प्रति तास या वेगाने धावण्यासाठी डिझाइन केलेली आहे, तरीही सध्या ती साधारण १२० ते १३० किमी वेगाने धावण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या आरामासाठी यामध्ये जागतिक दर्जाची सस्पेन्शन यंत्रणा आणि एर्गोनॉमिक डिझाइनचे बर्थ देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात स्वयंचलित दरवाजे असून ते केवळ स्थानकावरच उघडतील. तसेच, आणीबाणीच्या काळात प्रवाशांना लोको पायलटशी थेट संवाद साधता यावा यासाठी ‘इमर्जन्सी टॉक-बॅक युनिट’ची सोय करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत ही ट्रेन अतिशय प्रगत आहे. यामध्ये ९९ टक्के जंतूंचा नाश करणारी प्रगत निर्जंतुकीकरण यंत्रणा वापरण्यात आली आहे. रेल्वेतील वॉशरूम्समध्ये सेन्सरयुक्त नळ आणि आधुनिक स्वच्छता सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना स्वच्छ चादरी आणि टॉवेल्स पुरवले जातील. भारतीय रेल्वेने या प्रवासाचे तिकीट दरही निश्चित केले असून, त्यात जेवणाचा खर्च समाविष्ट आहे. तृतीय श्रेणी वातानुकूलित (3AC) प्रवासासाठी २,३०० रुपये, द्वितीय श्रेणीसाठी (2AC) ३,००० रुपये आणि प्रथम श्रेणीसाठी (1AC) ३,६०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.