Governor Rajendra Arlekar: शिक्षणाचा उद्देश पैसा नसून, माणूस घडवणे असावा
Governor Rajendra Arlekar:

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन
Governor Rajendra Arlekar: शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी, मोठे पॅकेज किंवा आर्थिक सुबत्ता मिळवण्यापुरता मर्यादित नसावा; तर शिक्षणातून समाजाची उन्नती साधणारा आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणारा चांगला माणूस घडणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेच्या द्वितीय दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याच व्यासपीठावरून ‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी, पुणे’ या नूतन विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात व्यवस्थापन तुकडी व सीएसआर-सहाय्यित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी फ्युएलचे कुलपती डॉ. सुलभा देशपांडे, फ्युएलचे अध्यक्ष आणि कुलगुरू केतन देशपांडे, तसेच, गणेश मोहन, प्रत्युष मेहरोत्रा, आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रा. मयूरी देशपांडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केवळ पदव्या मिळवून नोकरी शोधणारे न बनता, इतरांसाठी संधी निर्माण करणारे रोजगार निर्माते बनावे, असे आवाहन आर्लेकर यांनी केले. फ्युएलचे अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी संस्थेच्या २० वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत डेटा सायन्स व फायनान्स क्षेत्रातील उद्योगपूरक शिक्षणावर संस्थेचा भर असल्याचे सांगितले. गणेश मोहन यांनी बदलत्या तंत्रज्ञानात मानवी संबंध जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.





