MD Drugs Case – शहरातील वाढत्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जच्या विळख्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता थेट सेवन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हे शाखेने सोमवारी १७ जणांना पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशी केली. यामध्ये दोन-तीन महिलांसह एका सरपंचाचाही समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर या सर्वांना हजर करण्यात आले. उपायुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी करण्यात आली. एमडी ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची संख्या सुमारे तीनशे ते साडेतीनशेच्या घरात असून या सर्वांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. उत्तमनगर पोलिसांनीही या प्रकरणात धडक कारवाई करत आतापर्यंत सहा ड्रग विक्रेत्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील उर्फ राठ्या राठोड याला कोंढवे धावडे परिसरातून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एमडीच्या पुड्या सापडल्या. त्यानंतर चौकशीदरम्यान त्याने अनेक तरुणांना ड्रग्ज विक्री केल्याचे तसेच काहीजणांकडून ड्रग्ज खरेदी केल्याचेही उघड झाले. या कारवाईत राजन गोपाल नायर, जतीन जयवंत कदम आणि शुभम संतोष दहिभाते यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी २ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये ८.१९ ग्रॅम एमडी आणि एक दुचाकीचा समावेश होता. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमली पदार्थ कारवाई(संग्रहित फोटो) ड्रग विक्रीसाठी पोर्टर सेवेचा वापर राठोडच्या मोबाईल तपासात मोठी माहिती हाती आली असून गेल्या चार महिन्यांत त्याने ३०० हून अधिक व्यवहार केल्याचे आढळले आहे. या व्यवहारांची एकूण रक्कम सुमारे ९ लाख असून बहुतेक व्यवहार दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहेत. काही व्यवहार १० ते १५ हजार रुपयांपर्यंत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व व्यवहारांमुळे ड्रग्ज विक्रीसाठी ऑनलाईन नेटवर्कचा आणि पोर्टर सेवेचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान ड्रग्ज विक्रेते आणि सेवन करणारे अशा एकूण ७६ जणांची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपासात ड्रग्ज पुरवठ्याची साखळी आणि मोठ्या पुरवठादारांपर्यंत पोहोचण्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे. या पार्श्वभूमीवर शहरात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे. “उत्तमनगर पोलिसांनी आजवर सहा ड्रगविक्रेत्यांना अटक केली आहे. तीघांचा शोध सुरु आहे. तपासात आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे. यामुळे विक्रेत्यांची संख्या दहावर गेली आहे. सेवन करणाऱ्या दहा-पंधरा जणांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली . जप्त ड्रग दहा ग्रॅम पर्यंत गेले आहे.” – राघवेंद्र क्षिरसागर ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर)