Mawal News: मावळात भातपिकाला पावसाची साथ! १३ हजार ५०० हेक्टरवर खरीप भाताची लागवड
Mawal News: मावळ तालुक्यात खरीप हंगामातील १३ हजार ५०० हेक्टरवर भात लागवड पूर्ण; वेळोवेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पीक जोमात.

Mawal News – मावळ तालुक्यात मान्सूनच्या पावसाचे पुन्हा दमदार आगमन झाले असून, त्याचा खरीप पिकांना मोठा फायदा होत आहे. पुरेशा पावसामुळे भातपिकाची वाढ जोमदार झाली असून शेतकरी सुखावले आहेत. यंदा तालुक्यात सुमारे १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप भाताची लागवड करण्यात आली आहे.
मावळ तालुका हा प्रामुख्याने भातासह भुईमूग, सोयाबीन, संकरित ज्वारी, कडधान्ये, चवळी, मूग, उडीद आणि वाटाणा या खरीप पिकांसाठी ओळखला जातो. जून महिन्यात पावसाने काहीसा ताण दिला होता. मात्र जुलैपासून पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची लागवड केली. तालुक्यात भाताची लागवड पूर्ण होऊन सुमारे दोन महिने झाले आहेत.
त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेळोवेळी झालेल्या दमदार पावसामुळे भातपिकाला पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे यंदाचे भातपीक दरवर्षीच्या तुलनेत चांगले आले असल्याचे चित्र आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना मावळात मात्र पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, तालुक्याची सरासरीही पूर्ण झाली आहे.
मावळात इंद्रायणीचा सुगंध!
यंदाच्या खरीप भात लागवडीपैकी तब्बल ९५ टक्के क्षेत्रावर इंद्रायणी भाताची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील गावागावांत इंद्रायणीच्या पिकाने परिसराला वेगळी ओळख मिळाली आहे. तालुका कृषी विभागाने भात लागवडीसाठी विशेष मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडल अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे लागवडीला चालना मिळाली. काही भागांत नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी दिली.
इंद्रायणीला चांगल्या दराची आशा
मावळ अॅग्रोचे संस्थापक सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी मावळात इंद्रायणी भाताची लागवड वाढावी, यासाठी शेतकऱ्यांना शुद्ध व प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. उत्पादित इंद्रायणी भाताला हमीभावापेक्षा चांगला दर देण्याची हमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा इंद्रायणीच्या लागवडीवर अधिक भर दिला आहे.






