Vadgaon Maval : इंद्रायणीचे आगार बहरले ! ९५ टक्के भात लागवड पूर्ण
Vadgaon Maval : उर्वरित लागवड दोन-तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता

वडगाव मावळ : – मावळ तालुक्यात भात लागवडीच्या कामांना वेग आला असून, आतापर्यंत ९५ टक्के भात लागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित लागवडही पुढील दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाने सुरुवातीला ओढ दिली असली, तरी त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे.
मावळ तालुका हा इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तांदळाला राज्यभर मोठी मागणी आहे. तालुक्यात भात लागवडीचे एकूण १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे ११ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे.
याशिवाय ५५० हेक्टरवर सोयाबीन, तर १०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा सुरुवातीला एल-निनोच्या प्रभावामुळे जूनमध्ये पावसाने ओढ दिली. त्यामुळे भात रोपवाटिका तयार करण्यास विलंब झाला. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पुनर्लागवडीच्या कामांना वेग आला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे लागवड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. गावोगावी प्रशिक्षण, भात-सोयाबीन पीक मार्गदर्शन मेळावे आणि शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले.
पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप स्पर्धेत तालुक्यातील ३२ शेतकरी गट सहभागी झाले आहेत. तज्ज्ञांकडून या गटांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी नितीन राऊत आणि उपकृषी अधिकारी मिनाज शेख यांनी दिली.
‘सध्या लागवड केलेले भात पीक जोमदार स्थितीत आहे. पिकावर कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही. शेतकऱ्यांनी शेतातील अनावश्यक तण काढावे. गरजेनुसार खतांची मात्रा द्यावी. कीड-रोग आढळल्यास कृषी विभागाच्या सल्ल्यानेच फवारणी करावी.’ – विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी.





