Sugarcane agitation : वाळवा तालुक्यात ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
Sugarcane agitation : वाळवा तालुक्यात ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. वाघवाडी फाटा येथे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून टायरमधील हवा सोडली.

Sugarcane agitation : ईश्वरपूर (जि. सांगली) – या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यात ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने आज आंदोलनाची पहिली ठिणगी पडली. वाघवाडी फाटा परिसरात एन. डी. शुगर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. ट्रॅक्टरच्या टायरमधील हवा सोडत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.
उसाला प्रति टन पाच हजार रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे पाच हजार रुपये प्रतिटन पहिली उचल देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. वाळवा तालुक्यातील आंदोलनामुळे चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून साखरेला भाव पाच ते साडेपाच हजाराच्या पुढे विक्री होत आहे, सामान्य जनतेला 60 ते 65 रुपये किलोने साखर मिळत आहे. तरी साखर कारखानदार दर देण्यास बोलत नाही. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील दराची चर्चा आता अधिक तापण्याची शक्यता आहे.




