Maval Panchayat Samiti : सुनीता येवले मावळच्या नव्या ‘सभापती’! साहेबराव कारके उपसभापती; आमदारांनी केली घोषणा
Maval Panchayat Samiti : जिल्हा परिषदेच्या पाचही जागांवर राष्ट्रवादीचा विजय; मावळचे राजकीय वजन वाढले, जिल्हा पातळीवर मोठ्या पदाची अपेक्षा.

Maval Panchayat Samiti – मावळ तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. पंचायत समितीच्या सभापतीपदी सुनीता येवले आणि उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडीची अधिकृत घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.पंचायत समितीच्या सभापतीपदी चांदखेड गणातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या सुनीता येवले यांना संधी देण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवर सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे. उपसभापतीपदी साहेबराव कारके यांची निवडही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, पंचायत समितीच्या कारभारात त्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेल्या प्रचार रणनीतीला मोठे यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा प्रचार आणि संघटनात्मक बांधणी यामुळे पक्षाला व्यापक पाठिंबा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, शेती, रोजगार, पाणीपुरवठा आणि शिक्षण या मुद्द्यांवर मतदारांनी विश्वास दाखवल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे, जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने पाचही जागांवर विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषदेत मिळालेल्या या एकहाती सत्तेमुळे मावळ तालुक्याचे राजकीय वजन वाढले असून, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा महत्त्वाच्या सभापतीपदावर मावळ तालुक्यातील प्रतिनिधीला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या निकालामुळे तालुक्यातील राजकीय स्पर्धेला नवे स्वरूप मिळाले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही स्तरांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्याने आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षाला बाजूला सारत मतदारांनी नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे मावळ तालुक्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलली असून, राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी मिळालेल्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.





