Pune ZP Election Results : जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी? राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

Pune ZP Election Results : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. निवडणुकीत ७३ पैकी ५१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवित जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण गटासाठी आहे. त्यामुळे पक्षात इच्छुकांची संख्याही मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या काही सदस्यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेत काम केले आहे.
यात दौंड तालुक्यातील खडकी गटातून वीरधवल जगदाळे, आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी गटातून विवेक वळसे पाटील, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गटातून शांताराम इंगवले, तर भोर तालुक्यातील भोंगवली गटातून विक्रम खुटवट यांचा समावेश आहे.
याचबरोबर अनेक तरुण सदस्यही प्रथमच निवडून आले आहेत. यापूर्वीही पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्याला अध्यक्षपद मिळाले होते. त्यामुळे नव्याने निवडून आलेले सदस्यही अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
विजयी उमेदवारांच्या नावांचा गॅझेट बुधवार (दि. ११) रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल.





