Maval News: ‘हे बीडीओ नकोच!’ गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठोकले टाळे…नेमकं कारण काय?
Maval News: सभापती सुनीता येवले आणि उपसभापती साहेबराव कारके यांच्या नेतृत्वाखाली मावळात आंदोलन; प्रशासकीय आणि राजकीय संघर्षाने मावळचे राजकारण तापले.

Maval News – तब्बल अडीच महिन्यांच्या रजेनंतर मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) कुलदीप प्रधान आज पुन्हा रुजू होणार असल्याची माहिती मिळताच पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडले. गटविकास अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू न देण्याचा निर्धार करत अखेर त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. तसेच, “आम्हाला हे बीडीओ नकोच, त्यांच्या जागी नवीन अधिकारी द्यावा,” अशी ठाम मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी पंचायत समिती सभापती सुनीता येवले, उपसभापती साहेबराव कारके, जिल्हा परिषद सभापती दिपाली हुलावळे, गटनेते दिलीप ढोरे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र कडलक, योगेश लोहोर, रेश्मा देवकर, शैला कालेकर, प्राची गायकवाड, आशा मोरमारे तसेच जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, अनंता पावशे, पल्लवी दाभाडे आणि मनिषा मुऱ्हे उपस्थित होते. गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान हे सुमारे अडीच महिन्यांपासून रजेवर असून त्यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत.
नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच प्रधान रजेवर गेल्याची बाबही पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली. प्रधान आज पूर्ववत सेवेत रुजू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून पंचायत समिती व जिल्हा परिषद पदाधिकारी कार्यालयात एकत्र जमले. गटविकास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू द्यायचे नाही, अशी भूमिका त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती.
सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गटविकास अधिकारी प्रधान यांची वाट पाहिल्यानंतरही ते न आल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. “केवळ आठ दिवसांच्या रजेवर जात असल्याचे सांगून गेलेले अधिकारी तब्बल अडीच महिने गैरहजर राहिले. प्रशासकीय कारभाराच्या काळात ते नियमित उपस्थित राहायचे; मात्र लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे हे गटविकास अधिकारी आम्हाला मान्य नाहीत,” अशी भूमिका सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.





