खळबळजनक..! गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच; व्हिडिओ व्हायरल होताच थेट निलंबन
Jalna Crime News : जाफ्राबाद पंचायत समितीतील विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आहे

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पंचायत समिती कार्यालयात लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देयक मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोरच पैसे स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील १५व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या कामांच्या देयकासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे. या निधीतून नाली बांधकाम आणि सभागृहातील फरशी बसवण्याचे काम करण्यात आले होते. संबंधित कामांचे बिल मंजूर करण्यासाठी विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांनी पैसे स्वीकारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
विशेष म्हणजे पंचायत समितीच्या कार्यालयातच गटविकास अधिकाऱ्यांसमोर पैसे घेतल्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ गेल्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी बी. ए. चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.





