Pune District : महाळुंगे इंगळेत प्रचंड वाहतूक कोंडी; सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच बिकट
Pune District : विशेषतः महाळुंगे येथून तळेगाव औद्योगिक वसाहतीकडे तसेच तळवडे येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे जाणार्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

महाळुंगे इंगळे : पुणे जिल्ह्यातील महाळुंगे इंगळे परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच बिकट होत असून प्रवाशांना दररोज तासन्तास वाहतुकीत अडकून राहावे लागत आहे.
विशेषतः महाळुंगे येथून तळेगाव औद्योगिक वसाहतीकडे तसेच तळवडे येथील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडे जाणार्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आंबेठाण रस्त्यावर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून संपूर्ण परिसर ठप्प होण्याची वेळ येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मुख्य रस्त्यांवरील कोंडीमुळे वाहनचालक गावातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करत आहेत.
त्यामुळे लहान रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक वाढून परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. काही ठिकाणी तर घरासमोरच वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. महाळुंगे इंगळेपुरती ही समस्या मर्यादित न राहता चाकण परिसरातही वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत आहे. औद्योगिक क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या वाढीमुळे वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यानुसार पायाभूत सुविधा मात्र विकसित झालेल्या नाहीत.
दररोज कामावर जाताना आणि परतताना तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतूक कोंडीचा वाढता प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
कोंडीची प्रमुख कारणे
अपुरी व अरुंद रस्ते व्यवस्था
झपाट्याने वाढलेली लोकसंख्या व वाहनांची संख्या
मुख्य चौकांमधील अतिक्रमणे
अव्यवस्थितपणे उभ्या केल्या जाणार्या रिक्षा
वाहतूक पोलिसांचे अपुरे नियोजन व सिग्नल व्यवस्थेचा अभाव
खराब रस्त्यांमुळे वाहनांचा मंद वेग
या सर्व कारणांमुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस तीव्र होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या मागण्या
रस्त्यांचे रुंदीकरण व तातडीने दुरुस्ती
प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा सुरू करणे
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे
उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारणे





