लोणी काळभोर, (वार्ताहर) – अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असतानादेखील 16 वर्षांच्या मुलीचा विवाह केल्याची धक्कादायक घटना हवेली तालुक्यात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आईसह 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पतीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 17 वर्षीय पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2023 ते 2024 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आईने एका तरुणाशी ठरविला होता. विवाहाच्या वेळी मुलगी 16 वर्षांची असतानादेखील देखील या विवाहाला कोणीच विरोध केला नाही. हा विवाह परिसरातील एका मंगल कार्यालयात पार पडला.
विवाहानंतर आरोपी पतीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. यातून पीडिता गरोदर राहिली. प्रसूतीदरम्यान, अल्पवयीन मुलीच्या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत