बाजार अस्थिर, तरीही गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला: जूनमध्ये SIPमध्ये विक्रमी 27,000 कोटींची गुंतवणूक

मुंबई – शेअर बाजारात पहिल्या तिमाहीत बरीच अनिश्चितता होती. निर्देशांक कमी -जास्त होत होते. मात्र या कालावधीत एसआयपी खात्यांची संख्या 1.67 कोटींनी वाढली आहे. त्या अगोदरच्या म्हणजे मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत एसआयपी खात्यांची संख्या 1.41 कोटींनी वाढली होती.
असोसिएशन ऑफ म्युचल फंडस इन इंडिया या संघटनेने ही माहिती जारी करताना सांगितले की, या क्षेत्रात ग्रो कंपनी आघाडीवर आहे. या कंपनीकडे जून अखेर संपलेल्या तिमाहीत नवी 41.9 लाख खाती उघडण्यात आली. एकूण खात्यात या कंपनीतचा भाग 25% इतका आहे. एकट्या जून महिन्यात ग्रोकडे नवी 15.7 लाख खाती उघडण्यात आली. पहिल्या तिमाहीत ग्रोच्या एसआयपी खात्याच्या माध्यमातून गुंतवण्यात आलेली रक्कम 32 टक्क्यांनी वाढून 1,116 कोटी रुपये इतकी झाली आहे.
एंजल वन या कंपनीकडे या तिमाहीत 15 लाख नवी खाती उघडण्यात आली. याशिवाय स्टेट बँक, एचडीएफसी सिक्युरिटीज, फोन पे इत्यादी कंपन्याकडेही खात्याची संख्या वाढत असल्याचे दिसून येते. या कालावधीत शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच अस्थिर होते. निफ्टी 50 या निर्देशांकाने या कालावधीत 5% च्या जवळपास परतावा दिला. मात्र तरीही गुंतवणूकदारांचा एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यावरील विश्वास कायम आहे.
एसआयपीच्या माध्यमातून जून महिन्यात झालेले गुंतवणूक विक्रमी म्हणजे 27,269 कोटी रुपये इतकी आहे. यामुळे जून अखेर एसआयपीच्या नियंत्रणाखालील एकूण मालमत्ता 15.3 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 12.4 लाख कोटी रुपये होती.
किरकोळ गुंतवणूकदारांचा पुढाकार
विश्लेषकांनी सगितले की, एकूण म्युच्युअल फंड उद्योगाकडे पाहिले असता किरकोळ गुंतवणूकदार या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परंपरागत बचत साधनाऐवजी गुंतवणुकीच्या नव्या साधनाचा शोध किरकोळ गुंतवणूकदार घेत आहेत. त्यांना म्युच्युअल फंड व एसआयपी अधिक आकर्षक वाटत आहे. त्याचबरोबर बाजारात अस्थिरता असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर निर्णय घेणे अवघड जात असल्यामुळे हे किरकोळ गुंतवणूकदार एसआयपीचा आधार घेत असल्याचे दिसून येते.




