SIP: पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक शेअर बाजारासह भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झालेल्या या पडझडीमुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः ज्यांनी म्युच्युअल फंडामध्ये ‘एसआयपी’ (SIP) सुरू केली आहे, त्यांच्यासमोर आता एकच प्रश्न आहे – ही एसआईपी सुरू ठेवावी की तूर्तास बंद करावी? बाजारातील पडझडीचा गुंतवणूकदारांवर परिणाम – सोमवारी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स १,२०० हून अधिक अंकांनी गडगडला, तर निफ्टीने ३०० अंकांची घसरण नोंदवली. भारतात सध्या सुमारे ९.९२ कोटी सक्रिय एसआयपी खाती आहेत. बाजार ‘लाल रंगात’ पाहून अनेक नवीन गुंतवणूकदार घाबरून एसआयपी थांबवण्याचा विचार करत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा निर्णय भविष्यात महागात पडू शकतो. हेही वाचा -‘एका मैत्रीसाठी दुसरी मैत्री तोडू नये’; इराणच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा तज्ज्ञ काय म्हणतात? एसआयपी थांबवणे ही मोठी चूक: ‘स्टेप ट्रेड कॅपिटल’च्या संचालिका क्रेशा गुप्ता यांच्या मते, एसआयपी हे शिस्तबद्ध गुंतवणुकीचे साधन आहे. बाजारातील अस्थिरतेच्या काळातच एसआयपीचे खरे महत्त्व अधोरेखित होते. गुंतवणूक थांबवल्यास चक्रवाढ व्याजाचा (Compounding) फायदा मिळणे बंद होते. स्वस्त दरात जास्त युनिट्स खरेदीची संधी: ‘फॉर्चुना अॅसेट मॅनेजर्स’चे पार्टनर आशिष आनंद सांगतात की, बाजार पडतो तेव्हा गुंतवणूकदारांना कमी किमतीत जास्त युनिट्स खरेदी करण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय तणाव हे तात्पुरते असतात, त्यामुळे लांब पल्ल्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक सुरू ठेवणेच हिताचे आहे. इतिहासाची पुनरावृत्ती: ‘ट्रुनोर एंटरप्रायजेस’चे लेफ्टनंट कर्नल रोचक बक्षी यांनी स्पष्ट केले की, २००८ मधील जागतिक आर्थिक संकट असो किंवा २०२० मधील कोरोना काळ; ज्या गुंतवणूकदारांनी संयम राखून एसआयपी सुरू ठेवली, त्यांनाच पुढे जाऊन बंपर परतावा मिळाला आहे. ‘रुपी कॉस्ट एव्हरेजिंग’चा फायदा कसा होतो? समजा तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी करता. जर एखाद्या फंडाचे NAV १०० रुपये असेल, तर तुम्हाला १०० युनिट्स मिळतात. जर युद्धामुळे बाजार २० टक्क्यांनी पडला आणि NAV ८० रुपयांवर आली, तर त्याच १०,००० रुपयांत तुम्हाला १२५ युनिट्स मिळतील. म्हणजेच, बाजार पडलेला असताना तुम्हाला अतिरिक्त २५ युनिट्स मिळतात, ज्याचा फायदा बाजार पुन्हा वधारल्यावर मोठ्या परताव्याच्या स्वरूपात होतो. गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची रणनीती: घाबरून निर्णय घेऊ नका: बाजार ५-१० टक्क्यांनी घसरणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. सहसा ३ ते ६ महिन्यांत बाजार पुन्हा सावरतो. आत्पकालीन निधी (Emergency Fund): पुढील ६ ते १२ महिन्यांच्या खर्चासाठी वेगळी तरतूद ठेवा, जेणेकरून बाजार पडलेला असताना गुंतवणूक मोडून पैसे काढण्याची वेळ येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर, गणित आणि इतिहास दोन्ही हेच सांगतात की, बाजारातील घसरण ही गुंतवणूक थांबवण्यासाठी नाही, तर गुंतवणुकीचा सरासरी खर्च (Average Cost) कमी करण्यासाठी असते. (अस्वीकरण: दैनिक प्रभातवर व्यक्त केलेला सल्ला किंवा मते ही तज्ञ/दलाली फर्मची वैयक्तिक मते आहेत. वेबसाइट किंवा तिचे व्यवस्थापन त्यासाठी जबाबदार नाही. प्रभात वापरकर्त्यांना कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच प्रमाणित तज्ञाचा सल्ला घेण्याचा सल्ला देते.)