Mutual Fund : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा ओघ कायम! ऑगस्टमध्ये आले 41,354 कोटी रुपये; SIPचा नवा विक्रम
Mutual Fund : एसआयपीद्वारे तब्बल ₹32,297 कोटी जमा; म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण मालमत्ता ₹87.08 लाख कोटींवर

Mutual Fund : शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहे. ऑगस्ट 2026 मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये ₹41,353.60 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली. विशेष म्हणजे, एसआयपीद्वारे होणारी गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय)ने गुरुवारी ऑगस्टचे आकडे जाहीर केले.
ऑगस्टमध्ये सर्व म्युच्युअल फंड योजनांमध्ये ₹14.09 लाख कोटी जमा झाले, तर गुंतवणूकदारांनी ₹13.68 लाख कोटी काढले. त्यामुळे निव्वळ गुंतवणूक ₹41,353.60 कोटी राहिली.
स्मॉलकॅपला सर्वाधिक पसंती
स्मॉलकॅप फंडांमध्ये ₹7,973.33 कोटींची सर्वाधिक निव्वळ गुंतवणूक झाली. मिडकॅप फंडांमध्ये ₹6,989.40 कोटी, फ्लेक्सीकॅपमध्ये ₹5,059.42 कोटी आणि लार्ज अँड मिडकॅप फंडांमध्ये ₹3,872.79 कोटी आले. मात्र, लार्जकॅप फंडांमधून ₹1,147.36 कोटी बाहेर गेले.
एसआयपीचा नवा विक्रम
ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे ₹32,297 कोटींची विक्रमी गुंतवणूक झाली. जुलैमध्ये हा आकडा ₹31,961 कोटी होता. ऑगस्ट 2025 मध्ये एसआयपीद्वारे ₹28,265 कोटी आले होते. म्हणजेच वर्षभरात एसआयपी गुंतवणुकीत सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत एसआयपीद्वारे ₹1.58 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम गुंतवली गेली आहे.
इक्विटी फंडात ₹29,329 कोटी
ऑगस्टमध्ये इक्विटी फंडांमध्ये ₹29,328.62 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली. ऑगस्टअखेर इक्विटी फंडांची एकूण मालमत्ता ₹39.21 लाख कोटी होती. दरम्यान, डेट फंडांमधून ₹8,127.32 कोटी बाहेर गेले. दुसरीकडे हायब्रिड फंडांमध्ये ₹10,045.34 कोटी आणि ईटीएफमध्ये ₹10,160.87 कोटींची निव्वळ गुंतवणूक झाली.
ऑगस्टअखेर म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ₹87.08 लाख कोटी झाली. उद्योगातील एकूण फोलिओची संख्या 28.35 कोटी झाली आहे. ऑगस्टमध्ये 26 नव्या म्युच्युअल फंड योजनांनी मिळून ₹7,110 कोटी उभारले.



