प्रशिक्षक राणांवर फोडले मनूने खापर

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या चुकीच्या वर्तनामुळेच मला पदक जिंकता आले नाही, असा गंभीर आरोप भारताची अव्वल नेमबाज मनू भाकर हिने केला आहे. प्रशिक्षक राणा यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळेच मला पदक जिंकता आले नाही, असे मनूने सांगितले आहे.

खरेतर राणा यांना प्रशिक्षकपदावरून भारतीय रायफल संघटनेने हटवलेही होते. तसेच काही महिन्यांपूर्वी नवी दिल्लीच्या कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेदरम्यान राणा यांनी मनूने पाठवलेला वैयक्तिक संदेश टी-शर्टवर लिहून वावरल्यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. यामुळेच मनू सोशल मीडियापासून लांब होती.

मी राणा यांना वैयक्तिक संदेश पाठवला नव्हता. माझ्या आईने तो संदेश पाठवला असावा. मात्र, हा संदेश मीच पाठवल्याचे राणा यांचे मत होते व त्यामुळे माझ्यावर टीका व्हावी याच हेतूने त्यांनी हाच संदेश त्यांच्या टी-शर्टवर लिहिला होता. विश्वकरंडक स्पर्धेवेळी मला प्रशिक्षकच नव्हते. जेव्हा मला मार्गदर्शकाची गरज होती, तेव्हा राणाच तिथे असायचे, ते माझ्यासाठी नव्हे तर अन्य खेळाडूंना मार्गदर्शन करायचे.

मार्गदर्शनासाठी मी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा माझ्याकडे प्रशिक्षकपदाची परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले होते. या सगळ्यामुळेच माझी मानसिकता खालावली होती व त्याचा फटका टोकियोत बसला, असेही मनूने सांगितले. यावर राणा यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राणा सातत्याने मला खाली खेचण्याच्या प्रयत्नात होते. राणा यांच्याबद्दल मला आदर होता व आजही आहे, पण त्यांनी माझ्याबाबत जो नकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यामुळेच माझी निराशा झाली. संघटनेने मात्र मला सातत्याने पाठिंबा दिला, असे मतही तिने व्यक्त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.