Mansoon Alert | वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस ; राज्यात कुठे किती धोका?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पावसाने रविवार रात्र आणि सोमवार सकाळपर्यंत मुसळधार हजेरी लावली. त्यानंतरही दुपारपर्यंत थोड्या थोड्या अंतराने पाऊस सुरूच होता. मंगळवारीही जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आणि गोव्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, पालघर, ठाणे, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यांचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
रायगड, पुणे जिल्ह्याचा घाट विभाग आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह खूप जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता अन्यत्र मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा विजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात मेघगर्जना, सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार, तर गोंदिया, नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.




