Mansoon Alert | घाटमाथ्यावर मुसळधार ; पुणे वेधशाळेचा ऑरेंज अलर्ट जारी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने शहरासह जिल्ह्यात गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून-मधून हलक्या सरी पडत असल्याने हवेत काहीसा गारवा होता. दरम्यान, जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून, पुढील दोन दिवसांत ताम्हिणीसह अन्य घाट परिसरात अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे पुणे वेधशाळेने घाट परिसरासाठी पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.शहर, उपनगरात सलग तीन ते चार दिवस सकाळीच वरूणराजा हजेरी लावत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या संततधारेने पुणेकरांची धांदल उडत होती. लाडक्या गणरायाच्या स्वागतालाही वरूणराजाने हजेरी लावली.
गुरूवारी (दि. २९) शहरासह उपनगरात पावसाचा जोर कमी झाला असून, पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला. दुपारी एक ते दोन हलक्या सरी पडल्या. शिवाजीनगर, लोहगांव परिसरात अर्धा मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या सरी पडत असून, घाटमाथ्यावर जोरदार सरींमुळे परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ताम्हिणी, अंबवने, दावडी, लोणावळा यासह भोर, वेल्हा, मुळशी, मावळ आणि जुन्नर परिसरात डोंगर आणि घाटमाथ्यावर जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पाऊस पडला. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील धबधब्यांचा प्रवाह वाढला असून, ओढे, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. ताम्हिणी परिसरात ४०, लोणावळा येथे ३७, अंबवने येथे ६३, दावडी परिसरात ४० तर डोंगरवाडी येथे ४५ मिमी पावसाची नोंद झाली.


