Jamkhed News : मुंबईकडे निघालेल्या जरांगेंची पाटोदा येथे प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल, दौरा तूर्तास रद्द?
Jamkhed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईतील आझाद मैदानाकडे निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे अचानक अधिकच खालावली आहे.

Jamkhed News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांची पाटोदा येथे प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री पाटोदा येथे सभा झाल्यानंतर जरांगे यांनी याच ठिकाणी मुक्काम केला. मात्र, बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. (Jamkhed News)
२९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली होती. (Jamkhed News)
नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारी जरांगे हे अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. गेवराई आणि बीड येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पाटोदा येथे पोहोचले. रात्री सुमारे दोन वाजता पाटोदा येथे त्यांची जाहीर सभा झाली. (Jamkhed News)
सभेतच प्रकृतीच्या तक्रारीचा उल्लेख
पाटोदा येथील सभेदरम्यान जरांगे यांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत भाष्य केले होते. “माझ्या पोटात आग पडल्यासारखे झाले आहे. ही आग कमी झाली तरच मी पुढे जाऊ शकेन, अन्यथा मला जाणे शक्य होणार नाही. दौऱ्यापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी सांगितले होते. (Jamkhed News)
रात्री मुक्काम केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे. (Jamkhed News)
महंतांच्या विनंतीनंतर उपचार घेण्यास तयारी
दरम्यान, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज तसेच श्री बंकट स्वामी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे पाटोदा येथे दाखल झाले. त्यांनी जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास तयारी दर्शवली. (Jamkhed News)
त्यानुसार पाटोदा येथेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून, सकाळपासून त्यांना चार सलाईन देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अपडेट मिळाल्यानंतर ते पुढील दौरा सुरू ठेवणार की रुग्णालयात दाखल होणार, याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Jamkhed News)
हजारो आंदोलक पाटोद्यातच थांबले
मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यात सहभागी होण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव त्यांच्या सोबत निघाले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार बुधवारी श्रीगोंदा येथे मुक्काम होणार होता. मात्र, जरांगे यांच्यावर पाटोदा येथेच उपचार सुरू असल्याने त्यांच्यासोबतचे आंदोलकही सध्या पाटोदा येथेच थांबले आहेत. (Jamkhed News)
जरांगे हे बुधवारी सकाळी पाटोदा येथून जामखेडमार्गे श्रीगोंद्याकडे जाणार होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा पुढील प्रवास तूर्तास थांबला आहे. त्यांच्या उपचाराच्या पार्श्वभूमीवर पाटोदा येथे पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. आता डॉक्टरांकडून मिळणाऱ्या पुढील वैद्यकीय माहितीनंतर मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याबाबत पुढील निर्णय स्पष्ट होणार आहे. (Jamkhed News)





