Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाहीच, खातेबदल होणार? अजित पवारांचा कडक इशारा

Manikrao Kokate : पावसाळी अधिवेशनात कोकाटे यांचा विधानसभेत मोबाइलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि त्यानंतर “शासन भिकारी आहे” अशा वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २९ जुलै २०२५ रोजी मंत्रालयात कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना कडक शब्दांत समज दिली.
“बोलताना भान ठेवा, सतत चुका करता, कितीदा माफ करणार? तुमच्या वक्तव्यांमुळे सरकारची बदनामी होत आहे,” असे म्हणत पवार यांनी कोकाटे यांची कानउघडणी केली. आता कोकाटे यांच्या राजीनाम्याऐवजी त्यांचे खातेबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे प्रकरण?
कोकाटे यांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या X हँडलवर शेअर केला होता, ज्यामुळे मोठा गदारोळ माजला. यानंतर कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत, “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केले.
या दोन्ही घटनांमुळे विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेत्यांनी कोकाटे यांना लक्ष्य करत सरकारवर टीकास्त्र सोडले.
अजित पवारांची नाराजी आणि खातेबदलाची चर्चा
अजित पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या वक्तव्य आणि कृतींवरून कडक इशारा दिला. “तुमच्या चुकीमुळे सरकारची प्रतिमा डागाळत आहे. असे कितीदा माफ करायचे?” असे म्हणत पवार यांनी कोकाटे यांना फटकारले. सूत्रांनुसार, कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलण्याचा विचार सुरू आहे. कृषी खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मकरंद पाटील यांच्याकडे, तर कोकाटे यांना पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खाते दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.





