Supriya Sule On Manikrao Kokate : रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून कोकाटेंना क्रीडा खातं; सुप्रिया सुळेंचा तीक्ष्ण शब्दात हल्ला

Ajit Pawar On Manikrao Kokate : विधान भवनात ऑनलाइन रम्मी खेळताना आढळलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीने शेतकऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल करत कोकाटे यांच्या बेजबाबदार वर्तनावर बोट ठेवले होते. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
अखेर सरकारने कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते सोपवले, तर अजित पवारांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांना नवे कृषिमंत्री बनवण्यात आले आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.
राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही.…
— Supriya Sule (@supriya_sule) August 1, 2025
महाराष्ट्र शासनाला ‘भिकारी’ म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे, असंही सुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून दुसरं महत्वाचं खातं
या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.





