Rohit Pawar : ‘मंत्र्यांनी जबाबदारीने वागावे’, कृषिमंत्रिपद दत्तात्रय भरणेंना देताच रोहित पवारांचा कडक इशारा

मुंबई : विधान भवनात ऑनलाइन रम्मी खेळताना आढळलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृतीने शेतकऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल करत कोकाटे यांच्या बेजबाबदार वर्तनावर बोट ठेवले होते. यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
अखेर सरकारने कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते सोपवले, तर अजित पवारांचे विश्वासू सहकारी दत्तात्रय भरणे यांना नवे कृषिमंत्री बनवण्यात आले. या निर्णयावर रोहित पवार यांनी तीक्ष्ण प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे की, मंत्र्यांनी जबाबदारीने वागावे, अन्यथा महाराष्ट्र त्यांचा असंवेदनशीलपणा सहन करणार नाही.
रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदाला न्याय न देणाऱ्या मंत्र्यांच्या कृतींचा फटका सर्वसामान्यांना बसतो. कोकाटे यांच्या बाबतीतही असेच घडले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आणि कृषी क्षेत्र संकटात असताना कोकाटे यांचा रम्मी खेळण्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा होता. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, सरकारने राजीनाम्याऐवजी खातेबदलाचा निर्णय घेतला.
पवार यांनी पुढे सांगितले की, क्रीडा आणि युवक कल्याण खातेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोकाटे यांनी भूतकाळातील चुका टाळून या खात्यात आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग करून युवक आणि क्रीडा क्षेत्राला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर, नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची आणि कृषी खात्याला लागलेले वादांचे ग्रहण दूर करण्याची मोठी जबाबदारी आहे.
कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 1, 2025
रोहित पवार यांनी सरकारला ठणकावताना म्हटले की, एखाद्या खात्यात गलथान कारभार झाला तर त्याची जबाबदारी संपूर्ण सरकारची असते. खातेबदल करून नेतृत्वाने आपली जबाबदारी झटकता येणार नाही. “आमचे सर्व खात्यांवर लक्ष आहे आणि राहणार आहे. कोणत्याही मंत्र्याचा असंवेदनशीलपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. सर्व मंत्र्यांनी जबाबदारीने वागावे, ही अपेक्षा!” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या खातेस्वप्नाने सरकारने शेतकऱ्यांच्या संतापाला आणि विरोधकांच्या टीकेला तात्पुरते उत्तर देण्याचा प्रयत्न केला असला, तरी रोहित पवार यांच्या या निवेदनाने सरकार आणि मंत्र्यांवरील दबाव कायम राहील, हे स्पष्ट आहे. आता दत्तात्रय भरणे आणि माणिकराव कोकाटे आपापल्या नव्या जबाबदाऱ्यांना कितपत न्याय देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




