सोनई – श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी (दि. 19) पहाटे 4 वाजल्यापासून परिसरातून, तालुक्यातील भाविकांनी पायी येऊन चौथरा शनिदर्शन, जलाभिषेक करून ओल्या वस्त्राने शनिदर्शन घेतले. दरम्यान, देवस्थान प्रशासनाने घेतलेल्या दोन तास मोफत चौथऱ्यावरील शनिदर्शनामुळे अलोट गर्दी पहावयास मिळाली.
शनिवारची नेहमीची गर्दी व परिसरातील गर्दी एकच झाल्याने दिवसभर भाविकांचा ओघ चालूच होता. शनिदेवाला श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची परंपरा असल्याने भाविकांनी स्नान करून दर्शन घेतले. ठिकठिकाणी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
शनिदेवाला साकडे
आ. शंकरराव गडाख, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती सुनील गडाख आदींनी पाऊस पडावा व भरभरून पिकाची समृद्धी व्हावी, अशी प्रार्थना करून शनिचरणी साकडे घातले.
देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस दीपक दरंदले, पोलिस पाटील ऍड. सयाराम बानकर आदींनी मान्यवरांसह भाविकांचे स्वागत केले.