Manchar News : नव्या एसटी बस आल्या, पण चालक नाहीत! सणासुदीत प्रवाशांची मोठी गैरसोय

प्रभात वृत्तसेवा
मंचर – राज्यात दळणवळणाचा मुख्य आधार असलेले महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने गेल्या काही महिन्यांत नवीन एसटी गाड्या मोठ्या प्रमाणात विविध आगारांना दिल्या. मात्र, चालक आणि वाहकांची संख्या पुरेशी नसल्यामुळे अनेक एसटी गाड्या अगदी अस्तित्वात असतानाही तशा रस्त्यावर निघू शकत नाहीत.एसटी गाड्या आहेत.परंतु चालक-वाहकांची मोठी कमतरता असल्याने भविष्यात येणारे महत्त्वाचे सण यामध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
चालक-वाहकांच्या मोठ्या कमतरतामुळे मनाविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशांनुसार अतिरिक्त फेऱ्या, जास्त वेळ काम करावे लागल्याने चालक-वाहकांची मानसिकता बिघडत असून त्यांनी ताण,थकवा देखील व्यक्त केला आहे. पुणे विभागात उदाहरणार्थ, कोविडपूर्वी १,१०० एसटी गाड्या होत्या. परंतु सध्या फक्त ८५० एसटी गाड्या उपयुक्त स्थितीत आहेत. या विभागाला सुमारे २०० वाहकांची अंदाजे सद्यस्थितीत गरज असल्याचे सांगण्यात आले.
राज्यातील एकूण एसटी गाड्यांची संख्या अंदाजे सुमारे १५ हजार ५०० ते १६ हजार दरम्यान असून जवळपास अंदाजे ३ हजार एसटी चालक-वाहकांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून राज्यातील एसटी आगारांना नवीन एसटी गाड्या वितरित झाल्या.परंतु वाहकांची मोठी कमतरता आहे.दिवाळी उत्सव आहेत; सुट्ट्या लागणार आहेत, प्रवाशांची गर्दी वाढणार आहे.अशी वेळ जर चालक-वाहक वाढीव फेऱ्या करू शकणार नाहीत, तर सेवा व्यत्ययित होण्याची भीती आहे.
आठ तास ड्रायव्हर काम करतात, त्यानंतर विश्रांतीची गरज असते, पण सध्या ताण अधिक असल्यामुळे त्यांचे आरोग्य आणि सुरक्षा दोन्ही धोक्यात येत आहेत. विभागवार चालक-वाहकांची मोठी गरज आहे.सध्या एसटी चालक-वाहकांची भरती नाही.करारावरच्या किंवा तात्पुरत्या चालक-वाहकांना कामावर घेण्याचा मार्ग एसटीने अवलंबिला असला तरी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.एसटी गाड्या असून पण चालक-वाहक नसल्यामुळे त्या आगारात उभ्या आहेत.
“नवीन एसटी गाड्या आहेत.परंतु चालक-वाहक पुरेश्या प्रमाणात नाही. दिवाळीत प्रवाशांना गैरसोय होणार आहे.चालक-वाहकांची विश्रांती, वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे.अतिरिक्त कामामुळे अपघात होण्याची भीती आहे.”
-संजय पवळे,सरपंच, पेठ.
“एसटी गाडीची संख्या वाढली आहे हे छान आहे. पण तशी गाडी रस्त्यावर उतरली पाहिजे. चालकवाहक भरती केवळ घोषणेत न रहावी.सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते; सेवा कायम राहिली पाहिजे.यासाठी महामंडळे प्रयत्न करावे.”
– प्रवीण मोरडे,उद्योजक, मंचर.





