Shirur Encroachment Drive : अतिक्रमण हटाव मोहीम चर्चेत! गरीब व्यावसायिकांवर कारवाई, तर प्रभावशाली संस्था सुरक्षित?
Shirur Encroachment Drive : हातगाडी व्यावसायिकांचे व्यवसाय उध्वस्त, मात्र प्रभावशाली संस्थांच्या बांधकामांना अभय? शिरूरमध्ये कारवाईवरून सुरू झाली वादाची चर्चा.

Shirur Encroachment Drive – शिरूर नगरपरिषदेने पाबळ रोड ते विद्याधाम प्रशाला परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबवून अनेक हातगाडी व्यावसायिक, लहान दुकानदार व नागरिकांवरील कारवाई केली. मात्र, याच मार्गावर रस्त्याच्या मध्यरेषेपासून अंतराच्या नियमानुसार काही मोठ्या व प्रभावशाली संस्थांची बांधकामे आणि संरचना अद्याप कायम असल्याने नगरपरिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शिवसेवा मंडळाची इमारत, शिरूर नगरपरिषदेची जुनी इमारत तसेच विद्याधाम प्रशालेच्या काही संरचना या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असून त्यामुळे संबंधित ठिकाणी रस्ता अरुंद झालेला आहे. अतिक्रमण हटविण्याचे नियम सर्वांसाठी समान असतील, तर या बांधकामांवरही कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यावरील हातगाड्या, लहान दुकाने, गोरगरिबांचे व्यवसाय हटविताना प्रशासनाने तडजोड केली नाही. मात्र प्रभावशाली संस्था, मोठे व्यावसायिक किंवा सार्वजनिक संस्थांच्या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम सर्वसमावेशक आहे की निवडक कारवाईचा भाग आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
इंदिरा गांधी पुतळ्याचे पुनर्वसन रखडले
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान काही वर्षांपूर्वी (स्व) माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा पुतळाही चौकातील अतिक्रमणाचा भाग असल्याचे सांगून हटविण्यात आला होता. मात्र, तो पुतळा आजतागायत पुनर्स्थापित करण्यात आलेला नाही. सध्या हा पुतळा नगरपरिषदेच्या आवारात धूळ खात पडून असल्याची चर्चा आहे. संबंधित चौकाचे सुशोभीकरण व पुतळ्याचे पुनर्वसन कधी होणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.





