Junnar Accident : जुन्नरमध्ये काळाचा घाला! एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ४ तरुणांचा मृत्यू
Junnar Accident : हॉटेल जीवनदीपजवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; मराडवाडी आणि आंबेदरा गावातील चार युवकांचा दुर्दैवी अंत.

Junnar Accident – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हॉटेल जीवनदीपजवळ रविवारी (दि.24) रात्री आठच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे डिंगोरे, मराडवाडी आणि आंबेदरा परिसरावर शोककळा पसरली असून संपूर्ण जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
आशिष ढवळू भले (वय 24), दीपक सखाराम भले (वय 28, दोघेही रा. मराडवाडी, फाळूकदरा, डिंगोरे), शिवराम नारायण पारधी (वय 26) आणि खंडू नारायण भले (वय 25, दोघेही रा. आंबेदरा, डिंगोरे) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. कल्याण-पाथर्डी एसटी बस (एमएच 20 बीएल 2983) माळशेज मार्गे ओतूरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून (एमएच 14 एमए 7849) चार युवक ओतूरहून डिंगोरेकडे जात होते.
हॉटेल जीवनदीपजवळ समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर चारही युवक गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
जखमींपैकी तिघांना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. हरी सारखे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत गोरे आणि डॉ. वैष्णवी ठिकेकर यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. चौथ्या युवकाला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनीही त्याला मृत घोषित केले.
अपघातानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एकाच गावातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने डिंगोरे परिसरातील आदिवासी बांधवांमध्ये शोककळा पसरली असून गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.





