Ambegaon News : सहकार क्षेत्रात खळबळ! आंबेगाव खरेदी-विक्री संघाला मोठा धक्का; थकबाकीदार संचालकाचे पद रद्द
Ambegaon News : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ७३ (क) नुसार आंबेगाव तालुका सहाय्यक निबंधकांची कारवाई; संतोष सैद यांना थकबाकीमुळे अपात्र ठरवले.

Ambegaon News – महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार थकबाकीदार व्यक्तीस सहकारी संस्थेचे संचालकपद भूषवता येत नसल्याने आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष कोंडीभाऊ सैद यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांचे संचालकपद तात्काळ प्रभावाने रिक्त करण्यात आले असून या कारवाईमुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आंबेगाव तालुका सहाय्यक निबंधक तथा सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी हा आदेश जारी केला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1970 मधील कलम 73 (क) नुसार सहकारी संस्थेचा थकबाकीदार असलेल्या व्यक्तीस कोणत्याही सहकारी संस्थेच्या संचालक मंडळावर राहता येत नाही तसेच निवडणूक लढविण्यावरही निर्बंध आहेत. यासंदर्भात भाऊसाहेब पाटील यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर करण्यात आलेल्या पडताळणीत संतोष सैद यांच्यावर मंचर येथील शरद सहकारी बँकेची थकबाकी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळातील एक जागा रिक्त झाली असून पुढील नियुक्ती व निवड प्रक्रियेबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या कारवाईमुळे थकबाकीदार संचालकांविरोधातील नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.





