Manchar Murder Case: पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेला पती गजाआड; वळती येथून शिताफीने अटक
Manchar Murder Case: मंचर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाला मोठे यश; सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला शोध.

Manchar Murder Case – मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आरोपीला मंचर पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अल्पावधीत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१७/२०२६ दाखल असून,सपना दीपक पारधी (वय ३५, मूळ रा.वारूळवाडी, ठाकरखाडी, ता.जुन्नर, सध्या रा. थोरांदळे, ता.आंबेगाव)
यांचा खून झाल्याची फिर्याद शेती मालक किसन गंगाराम इंदोरे यांनी दिली होती. आरोपी पती दीपक गेणबा पारधी याने अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने डोके, मान,छाती व पोटावर वार करून पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रफिती,तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
अखेर तो वळती (ता.आंबेगाव) येथे नातेवाईकांकडे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीला १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक चौकशीत पती-पत्नीतील किरकोळ वादातून चाकू व मासे पकडण्याच्या लोखंडी गळाच्या साहाय्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे करीत आहेत.





