Shirur MPDA Action : शिरूरचा सराईत गुन्हेगार स्थानबद्ध! अब्दुलहक कुरेशीवर ‘एमपीडीए ‘ अंतर्गत मोठी कारवाई
Shirur MPDA Action : पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेवरून शिरूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; सार्वजनिक शांतता राखण्यासाठी कडक पाऊल.

Shirur MPDA Action – शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या करून गोमांस विक्री करणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या अब्दुलहक जलील कुरेशी (शेख) या सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेवरून शिरूर पोलिसांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. गुरुवारी (दि. १२ मार्च २०२६) आरोपीला ताब्यात घेऊन त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
अब्दुलहक कुरेशी (वय ४६, रा. खाटीक आळी, शिरूर) याच्यावर जनावरांची अवैध कत्तल करणे, पोलिसांना धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्याच्या विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला होता. जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रस्तावाचा सखोल आढावा घेऊन आरोपीला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली. या कठोर कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे.





