मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर पोलीस ठाण्याच्या नियोजित इमारती शेजारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातुन आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे व जिल्हा वाहतूक शाखेचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी इमारत बांधकामासाठी 89 लाख 67 हजार निधी वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
पोलीस अधीक्षक पुणे (ग्रामीण) यांच्या आस्थापनेवरील मंचर पोलीस ठाणेअंतर्गत 8 कोटी 96 लाख 67 हजार 495 रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गृह विभाग मागणी, इतर प्रशासनिक सेवांवरील भांडवली खर्च, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण पोलीस विभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे, मोठी बांधकामे या लेखाशीर्षाखाली सन 2021-22 या चालू वित्तीय वर्षात पूरक अनुदान म्हणून 89 लाख 67 हजार इतकी रक्कम पोलीस महासंचालय यांना अर्थसंकल्पीय अंदाज, वाटप आणि सनियंत्रण प्रणालीवर वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
89 लाख 67 हजार रुपये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथून आहरित करण्यासाठी पोलीस महासंचालक मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर त्यांच्या अधिनस्त आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. निधीचा अध्यादेश शुक्रवारी (दि. 18) राज्याचे गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सहीने पारित झाला आहे, अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी दिली.