Khed Shivapur Protest : आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्ते अटकेत! खेड-शिवापूर टोलनाक्यावर हाय व्होल्टेज ड्रामा; नक्की काय घडलं?
Khed Shivapur Protest : मुंबई-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांची रणनीती; आंदोलक एकत्र येण्यापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात.

Khed Shivapur Protest – खेड शिवापूर टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार होते. परंतु पोलिसांनी आंदोलन करण्याआधीच आंदोलन करणाऱ्याना पकडले. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. पोलीस प्रशासनाने आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांना ताब्यात घेतले.
पोलीस निरीक्षक राजेश गवळी, आंदोलकांमध्ये यावेळी शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नसरापूर घटनेचा निषेध करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच खेड शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ५०० ते ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला होता. संभाव्य तणाव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच रणनीती आखत आंदोलकांना एकत्र येण्यापूर्वीच ताब्यात घेतले. आंदोलकांचा उद्देश टोल नाका बंद करून मुंबई-सातारा महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा होता.
मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना राजगड पोलीस ठाण्यात हलविण्यात आले. या दरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत तीव्र संताप व्यक्त केला. विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक, राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेत असून ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत.
आंदोलन दडपले- नागरिकांचा आरोप
दरम्यान, खेड शिवापूर येथील कारवाईनंतर काही नागरिकांनी प्रशासनावर मनमानी कारभाराचा आरोप केला आहे. “आम्हाला शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असताना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच आम्हाला ताब्यात घेतले,” अशी नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठीच ही कारवाई केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.





