Manchar Accident: पुणे-नाशिक हायवेवर भीषण अपघात! भरधाव कंटेनरच्या धडकेने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Manchar Accident: भरधाव कंटेनरने प्रथम पिकअप अन् जीपला उडवले; रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणाला धडकल्याने उपचारापूर्वीच मृत्यू.

Manchar Accident – पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ गावच्या हद्दीत मंचर ढाब्याजवळ रविवार, दि.२ रोजी सायंकाळच्या सुमारास भरधाव कंटेनरने उभ्या वाहनांसह तरुणाला धडक दिल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत तोशित केशव घरत (वय २१, मूळ रा.नीलज, जि.गोंदिया, सध्या देहूरोड) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरती एकनाथ चाकाटे (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या, त्यांचा मावसभाऊ तोशित घरत व इतर मित्रमंडळी नाणेघाट येथे फिरून परत येत असताना पेठ गावातील मंचर ढाब्याजवळील ‘विश्रांती गुळाचा चहा’ येथे थांबले होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने प्रथम पिकअप वाहनाला, त्यानंतर जीपला धडक दिली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तोशित घरत याला जोरदार धडक बसली.
गंभीर जखमी झालेल्या तोशित याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात पिकअप, जीप, मोटारसायकल तसेच चहाच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. कंटेनर चालक निरज नंदकिशोर पांडे (वय २५ रा.पानिपत, हरियाणा) याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, मंचर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




